
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ईव्हीएम तपासण्यासाठी अर्ज केलेल्या नाराज उमेदवारांना, कोणत्याही मतदान केंद्रातील इव्हीएम तपासणीसह निवडणूक आयोगाने विविध पर्याय दिले आहेत.
लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेससह आठ अर्ज निवडणूक आयोगाला मिळाले आहेत. मंगळवारी ईव्हीएम तपासणीचे निकष आणि पर्याय आयोगाने जारी केले. विधानसभा निकालांसंदर्भात तीन अर्ज आयोगाकडे आले आहेत. तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेसाठी अर्जदाराच्या पसंतीनुसार मतदारसंघातून ईव्हीएम उचलले जातील. विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रावरील ईव्हीएम युनिट्स मिक्स आणि मॅच करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. उमेदवार ईव्हीएम संचाची जुळणी त्याच्या पसंतीनुसार करू शकतो. मात्र, मतदान पत्रिका मोजणी आयोगाने विहित केलेल्या मोजणीच्या प्रक्रियेनुसार केली जाईल.