व्हेंटिलेटरवर असलेली रेल्वेही आता मित्राला देणार का? विरोधकांनी लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना घेरले

कोटय़वधी हिंदुस्थानी नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या भारतीय रेल्वेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आज व्हेंटिलेटरवर असलेली ही रेल्वे मित्राच्या हवाली करण्याची तयारी सुरू आहे का, असा सवाल करत विरोधी पक्षांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना घेरले.

रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणात असलेल्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच वंदे भारत ट्रेनचे छायाचित्र दाखवत रेल्वेची स्थिती अत्यंत गंभीर असून ती लपवता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. रेल्वेचा अर्थसंकल्प 8.22 कोटी रुपयांचा असून त्यात 2.55 लाख कोटी रुपये हिंदुस्थान सरकारकडून मिळतात. तर उर्वरित रेल्वे मंत्रालयाचा स्वतःचा महसूल आहे. यावरून रेल्वे मंत्रालयाचा कारभार आपल्याच कमाईतून सुरू आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वेळ असतो तेव्हा रील बनवतात, दुर्घटनेवेळी गप्प बसतात

हळूहळू सरकारी कंपन्यांची अवस्था बिकट होत असून त्या सर्व मित्रांना विकल्या जात आहेत. आता रेल्वेही मित्राला विकण्याचा डाव आहे का? वेळ असतो तेव्हा रील बनवता आणि जेव्हा दुर्घटना होते तेव्हा गप्प बसता, अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला. दरम्यान, वंदे भारत रेल्वे बिर्याणीसारखी आहे. त्यामुळे ही रेल्वे डाळ, चपाती खाणाऱया गरीबांसाठी नवीन आणि महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन सरकारने बुलेट ट्रेनऐवजी वंदे भारतवर लक्ष केंद्रित करायला हवे, तसेच दुर्घटनाग्रस्तांना तत्काळ मदत द्यायला हवी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी रॉय यांनी केली.