हाथरस दुर्घटना, मणिपूरमधील हिंसाचार, नीट परीक्षेतील गोंधळ, संविधान संरक्षण आदी मुद्दय़ांवरून राज्यसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना सोयिस्कररीत्या बगल देत आणीबाणी आणि अन्य विषय सभागृहापुढे मांडत काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आपल्या भाषणात केला. मोदी मांडत असलेल्या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना भूमिका मांडायची होती, परंतु त्यांना सभापतीनी बोलू दिले नाही. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. आजवर संसदेत भाजपची साथ देणाऱया ओडिशातील बिजू जनता दलाच्या नऊ खासदारांनीही यावेळी सभात्याग केला.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत प्रवेश करताच भाजप समर्थकांनी घोषणा देत स्वागत केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेल उत्तर देण्यास पंतप्रधान मोदी उभे राहताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ज्या पक्षाने आणीबाणीच्या काळात राज्यघटनेवर बुलडोझर फिरवला त्याच पक्षाचे नेते खरगे सभागृहाची दिशाभूल करत आहेत. मी आणीबाणी जवळून पाहिली आहे, लोकांवर अत्याचार झाले. संविधानाचा आत्मा असलेल्या डझनभर कलमे तोडण्याचे काम या लोकांनी त्या काळात केले, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणी आणि संविधानावरून कॉँग्रेसवर निशाणा साधला. त्यावर विरोधी सदस्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला, पण मोदी आपल्या भाषणापासून हटले नाहीत. अखेर मोदींच्या 32 मिनिटांच्या भाषणानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
…त्यांनी संविधानाला पाठ दाखवली – सभापती
विरोधकांनी सभात्याग केल्यानतंर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘अत्यंत दुःखदायक, अमर्यादित हे कृत्य आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही अडथळय़ाविना बोलण्याची संधी दिली. आज ते सदन सोडून गेले नाहीत, ते मर्यादा सोडून गेले. आज त्यांनी मला पाठ नाही दाखवली. संविधानाला पाठ दाखवली आहे.
मर्यादा विरोधकांनी नाही, मोदींनी मोडली – कॉँग्रेस
सभापती जगदीप धनखड यांच्या विधानावरूनच आता काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मर्यादेचे उल्लंघन हे विरोधकांनी केले नसून पंतप्रधान मोदींनी केले आहे, असे त्या म्हणाल्या. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
मणिपूर शांत होईल
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वीही तेथे अशा घटना घडल्या आहेत. तिथल्या सामाजिक संघर्षामुळे मणिपूरमध्ये दहावेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. तेथील परिस्थिती सामान्य करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असून मणिपूर शांत होईल, असे मोदी म्हणाले.
नीट घोटाळय़ातील दोषींना सोडणार नाही
पेपरफुटी ही मोठी समस्या आहे. या विषयात राजकारण न करता सर्व पक्षांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. नीट परीक्षेत गडबड करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱया दोषींना सोडणार नाही. घोटाळेबाजांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठीच एकापाठोपाठ एक कारवाई होत आहे. यासाठी आम्ही कडक कायदा केला आहे, असे मोदी म्हणाले.
अधिवेशनाची समाप्ती
संसदेच्या अधिवेशनाची आज समाप्ती झाली. दोनही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाज मंगळवारीच आटोपले होते. आज पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राज्यसभेच्या कामकाजाचेही सूप वाजले. पुढील मान्सून अधिवेशन जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.