राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयक 2024 मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या योजनेंतर्गत सरकार हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही विमानातून प्रवास करण्याची संधी देणार असे म्हटले जात होते. परंतु आज सर्वसामान्य महागाईने त्रस्त आहे या शब्दांत बीजू जनता दलाच्या खासदार सुलता देव यांनी सुनावले. दरम्यान भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ऑर्गनाईज्ड क्राईम अॅण्ड करप्शन रिपोर्टवरून विरोधकांवर टीका केली असता प्रचंड गदारोळ झाला आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधेयकात ड्रोनचा समावेश नसून कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रण यांचाही उल्लेख करण्यात आलेला नसल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी लक्ष वेधले. भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी लोकसभा निवडणुकांवर परदेशातील घडामोडींचा प्रभाव पडला होता असे रशियानेच म्हटल्याचे सांगितले. तसेचतीन वर्षांपासून संसदेतील कामकाजतही परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.
लोकसभेत सरकार, विरोधकांमध्ये जुंपली
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधी पक्ष संसद, सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करत असल्याचा आरोप केला व शून्यप्रहरात काँग्रेसला घेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक उडाली. अखेर कामकाज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास दुपारी 2 वाजेपर्यंत, त्यानंतर 3 वाजेपर्यंत आणि मग दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.