
ब्रिटनच्या लिड्स शहरात गुरुवारी रात्री हिंसाचार उसळला. जमावाने पोलिसांच्या गाडय़ा आणि बसेस पेटवून दिल्या. चाईल्ड केअर एजन्सी मुलांना त्यांच्या पालकांकडून ताब्यात घेत होती आणि त्यांना बाल संगोपन केंद्रात पाठवत होती. याच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार उफाळला, असे वृत्त ब्रिटिश मीडिया आऊटलेट मिररने दिले आहे. या हिंसाचाराचे व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाले असून मिळेल त्या साधनाने नागरिक वाहने पेटवून देताना व्हिडीयोत दिसत आहेत.
ब्रिटनमधील लिड्सच्या हरेहिल्स येथील लक्सर स्ट्रीटवर लोकांची गर्दी जमू लागली. त्यानंतर काही वेळातच जमाव हिंसक झाला आणि सैरावैरा धावत गाडय़ा आणि बस कचऱ्याच्या माध्यमातून पेटवू लागला. पोलिसांच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा त्यांच्यावरही जमावाने हल्ला करण्यास सुरुवात केली. या गर्दीत लहान मुलांचाही समावेश होता. या हिंसाचारामुळे प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया ब्रिटनच्या गृहमंत्री यवेत कूपर यांनी दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला असून ब्रिटनमध्ये अशा हिंसाचाराला जागा नाही, असे ते म्हणाले.
ब्रिटनमधील स्थिती सध्या नियंत्रणात असल्याचा दावा यॉर्कशायर पोलिसांनी केला आहे. हरेहिल्समध्ये सरकारी मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घरातच थांबावे, असे आवाहन गिफ्टन आणि हरेहिल्सच्या काऊन्सेलर सलमा आरिफ यांनी केले आहे.
पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक
हिंसाचार उफाळून आल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या असता जमावासह मुलांनी त्यांच्या गाडय़ांवर दगडफेक करण्यास आणि लायटर, कचरा, पेट्रोल किंवा ज्वलनशील द्रवपदार्थांच्या माध्यमातून गाडय़ा आणि बसेस पेटवून देण्यास सुरुवात केली. दरम्यान, मोठय़ा प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर हिंसाचार थांबला. पोलीस रात्री उशिरापर्यंत हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून लिड्स येथील हालचालींवर लक्ष ठेवून होते.