अदानी व संभलच्या मुद्द्यावरून गदारोळ, संसद ठप्पच

उद्योगपती गौतम अदानी प्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी तसेच उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणीही सरकारने सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी आज विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत लावून धरली. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेत आज अवघे 14 मिनिटे तर राज्यसभेत अवघे 15 मिनिटे कामकाज चालले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाचे खासदार अदानी व संभलप्रकरणी घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. त्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. मात्र सभागृहातील गदारोळ कायम राहिला. सभागृहाचा रागरंग पाहून तालिका सभापती संध्या राय यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेतही गदारोळ कायम

अदानी व संभलच्या मुद्दय़ावरून राज्यसभेचे काममकाजही बाधित झाले. सुरुवातीलाच कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतरही या दोन्ही मुद्दय़ांवरून प्रचंड गदारोळ सुरू झाला. सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

सभापतींची शिष्टाई संविधानावर संसदेत होणार चर्चा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अदानी व इतर विषयांवर सरकार विरुद्ध विरोधक अशा लढाईत संसदेचे कुठलेही कामकाज होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर संसदेतील पेच सुटावा यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज पुढाकार घेत लोकसभेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याबाबत सहमती झाल्याचे समजते. राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घटनेवर लोकसभेत 13 व 14 तर राज्यसभेत 16 व 17 असे दोन दिवस चर्चा होणार आहे. या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.