आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला? परिषदेत ‘नियमबाह्य’ गळचेपी होत असल्याचा विरोधकांचा आरोप

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सादर केलेला अविश्वासाचा ठराव सरकारने मंगळवारी फेटाळून लावला, तर आज सरकारच्या वतीने गोऱ्हे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करण्यात आला. मात्र या दोन्ही ठरावावेळी चर्चा न करता विरोधी पक्षाला बोलायला न दिल्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी ‘आम्हाला सभागृहात बोलायला देत नसाल तर आम्ही इथे यायचे कशाला,’ असा सवाल करत ‘हा विधान परिषदेतील काळा दिवस आहे, आम्ही सभापतींचा, सरकारचा निषेध करतो,’ असे म्हणत सभात्याग केला.

सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंवर विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर अनिल परब यांनी या ठरावावर बोलायची परवानगी मागितली, मात्र ती सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावली आणि ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला. याला विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेत आम्हाला बोलू द्या, अशी मागणी करत गदारोळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 2 वेळा तहकूब करावे लागले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच लक्षवेधी पुकारून कामकाज उरकण्यात आले. दरम्यान, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर शशिकांत शिंदे, भाई जगताप आदी विरोधी सदस्यांनी सरकारचा निषेध करत विरोधकांना बोलू का दिले जात नाही, असा सवाल केला.

सभागृहाने चुकीचा पायंडा पाडला आहे

सभागृहात विधिमंडळाची कामकाज पुस्तिका हातात घेऊन अनिल परब यांनी तालिका सभापतींना विश्वासदर्शक ठराव कोणत्या नियमानुसार मांडला गेला आणि संमत करण्यात आला ते सांगा, असा सवाल केला. सभापतींचा हा निर्णय आम्हाला अमान्य आहे. बहुमताचा माज सरकारला असेल तर तो मतदानाने सिद्ध करून दाखवावा. केवळ आम्ही अल्पमतात आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न होऊ नये असे अनिल परब म्हणाले.

विश्वासदर्शक ठरावावर चर्चा का झाली नाही?

हा ठराव सभागृहात मांडला गेल्यानंतर त्यावर चर्चा होणे आवश्यक होते. विश्वासदर्शक ठरारावर चर्चा का झाली नाही. सभागृहातील अधिकारीही यात दोषी आहेत. त्यांनीही नियमांचा खुलासा केला पाहिजे. विरोधी पक्षाने बोलायचे नाही का? सत्ताधारी पक्षाच्या लक्षवेधी लागतात, सत्ताधारीच पक्ष प्रश्न विचारतात आणि मंत्री त्यांनाच उत्तर देतात. सभागृहाचे कामकाज जाणीवपूर्वक एकांगीपणाने चालवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

सभापतींविरोधात अविश्वास ठराव

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आज अविश्वास ठराव दाखल केला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडत असून त्यांना पदावरून दूर करावे, अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापती कार्यालयाला दिले. पत्रावर महाविकास आघाडीच्या 14 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

…तर कामकाजावर बहिष्कार घालू!

विरोधी पक्ष उद्या काळ्या फिती लावून कामकाजात भाग घेणार आहे. मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे या पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असतील तर विरोधी पक्ष उद्या कामकाजावर बहिष्कार घालेल, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.