मोदी सरकार द्रोणाचार्यांप्रमाणे शेतकरी, विद्यार्थ्यांचे अंगठे कापतेय; लोकसभेत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देश संविधानाप्रमाणे चालणार की मनुस्मृतीप्रमाणे, असा संतप्त सवाल करतानाच मोदी सरकार आज द्रोणाचार्यांप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी अंगठा कापण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

देशाच्या संविधानाला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने लोकसभेत विशेष चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या घटनाविरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढवला. संविधानाचा विचार भगवान शिव, गुरुनानक, भगवान बसवेश्वर, कबीर यांच्याकडून आला. देशातील प्राचीन समृद्ध विचारधारा संविधानात ठायीठायी दिसून येते. परंतु आता मनुस्मृतीचे प्राबल्य वाढताना दिसत आहे. देश संविधानाप्रमाणे चालणार की मनुस्मृतीप्रमाणे, असा सवाल या वेळी राहुल गांधी यांनी केला.

महाभारतात गुरू द्रोणाचार्य यांनी एकलव्याला केवळ सवर्ण नसल्यामुळे धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला होता. परंतु एकलव्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवतो आणि त्या मूर्तीलाच गुरू मानून त्याला धनुर्विद्या शिकला. एकलव्य धनुर्विद्येत पारंगत झाल्याचे पाहून द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा दक्षिणा म्हणून मागितला. आता मोदी सरकारही तेच करत आहे. अदानींना धारावी म्हणून आंदण दिली आणि तेथील छोट्या व्यापाऱ्यांचा अंगठा कापला. बंदरे, विमानतळ अदानींना देताना इमानदार व्यापाऱ्यांचा अंगठा काढून घेतला जातोय. तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, पण तुम्ही पेपर फोडून त्यांचा अंगठा कापून घेता. शेतकरी हमीभाव मागतो, पण तुम्ही अदानी, अंबानींच्या झोळ्या भरून शेतकऱ्यांचा अंगठा कापता. अग्निवीर योजना आणता आणि देशातील तरुणांचा अंगठा कापून घेता, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

हाथरस येथील बलात्कार पीडितेचे कुटुंब घरात कोंडून ठेवले आहे आणि दुष्कर्म करणारे उजळमाथ्याने फिरत आहेत. तेथे संविधान नाही, तर मनुस्मृतीचे पालन होत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. सध्या जातीपातीत भांडणे लावण्याचे काम मोदी सरकार करत आहे. राजकीय समानता संपवण्यात आली आहे. सामाजिक समानता, आर्थिक समानताही राहिली नाही. त्यामुळेच आम्ही जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही आम्ही संपवणार, असेही राहुल गांधी म्हणाले.