देशातील ढासळत्या पायाभूत सुविधांचे ताजे उदाहरण, वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीवरून राहुल गांधींची टीका

उद्घाटन आणि प्रचार तेव्हाच चांगले असतात जेव्हा त्यामागील खरा हेतू जनतेची सेवा करण्याचा असतो; परंतु जेव्हा देशाच्या सार्वजनिक संपत्तीची नीट देखभाल केली जात नाही आणि लोकांचे जीव जाऊ लागतात तसेच पूल, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पुतळे उद्घाटन होताच ढासळू लागतात तेव्हा हा गंभीर विषय बनतो, चिंतेचा विषय बनतो. वांद्रे टर्मिनसवर झालेली चेंगराचेंगरी देशातील ढासळत्या पायाभूत सुविधांचे ताजे उदाहरण आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवरून केंद्र सरकारवर आणि रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

जरा विचार करा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यांतच ढासळतो, म्हणजे यामागचा स्पष्ट हेतू केवळ प्रचार करणे हाच होता. यात शिवाजी महाराजांचा सन्मानही नव्हता आणि जनतेच्या सुरक्षेचीही खबरदारी घेतली नव्हती, असेही राहुल गांधी म्हणाले. आज देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. ज्या सुविधा गरीबांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या असतील, व्यापार करता येईल, प्रवास उत्तम आणि सुरक्षा देणारा असेल हे लक्षात घ्यायला हवे. भारत सक्षम आहे, समर्थ आहे. आपल्याला केवळ प्रभावी आणि पारदर्शी यंत्रणेची गरज आहे. ज्या यंत्रणेचे लक्ष्य केवळ जनतेची सेवा असेल आणि फोकस देशाला भविष्यातील मजबूत पायाभूत सुविधा देता येईल हेच असावे याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे.