अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून विधान परिषदेत गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी सदस्यांना रोखणारे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे आज पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. विरोधकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता ठराव मंजूर करण्यात आला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या विधानावरून विधान परिषदेत भाजप सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना चिथावणी देत हातवारे केले. याचे पर्यवसान शेवटी शिवीगाळीत झाले आणि त्यानंतर झालेल्या प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. या घटनेबद्दल विधान परिषदेत आज दुपारी दोन वाजता सभागृह सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला. ठराव मांडताच उपसभापतींनी घाईघाईने ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले. दानवे यांचे निलंबन झाल्यावर विरोधकांनी गदारोळ केला. त्यांनी उपसभापतींविरोधात घोषणाबाजी केली. दानवे यांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात त्यांनी चर्चेची मागणी केली. चर्चा नसेल तर निदान दानवे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र उपसभापतींनी मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांंनी वेलमध्ये येत सभापतींच्या पक्षपातीपणाचा निषेध केला. ‘सभापती हाय हाय’, ‘न्याय द्या न्याय द्या-सभापती न्याय द्या’, ‘बहुमताच्या जोरावर निर्णय घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग करत दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला.

सभागृह तीन वेळा तहकूब 

विधान परिषदेत सोमवारी झालेल्या हातवारे आणि शिवीगाळ प्रकरणावरून आज सभागृहात झालेल्या प्रचंड गदारोळामुळे सभागृह तीन वेळा तहकूब करण्यात आले. सभागृहाचे विशेष कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. सुरुवातीला तारांकित प्रश्नोत्तराची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात होताना राज्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी मदतीची माहिती दिली. मात्र, त्यानंतर पुन्हा भाजप सदस्यांनी अंबादास दानवे यांच्यावर कारवाईची मागणी करत गोंधळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज एका तासांसाठी थांबवण्यात आले. त्यानंतर 12 वाजता सुरू झालेले सभागृहाचे कामकाजही पुन्हा 1 वाजेपर्यंत थांबवण्यात आले. त्यानंतर 1 वाजता सुरू झालेले सभागृह दानवे यांच्यावरील कारवाईच्या मागणीमुळे दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दिलगिरी व्यक्त करणार होतो!

भाजपने या पूर्वीही केंद्रात 150 खासदारांचे निलंबन करून आपण लोकशाही किती मानतो हे दाखवून दिले आहे. सभागृहात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे, ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. त्याबाबत मी आज सभागृहात दिलगिरी व्यक्त करणार होतो. मात्र, आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला माझी भूमिका मांडू दिली नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

निलंबनाच्या ठरावावर चर्चा करता येणार नाही – उपमुख्यमंत्री

सभागृहात दुपारी दोन वाजता अंबादास दानवे यांच्याविरोधात ठराव मांडला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. उपसभापतींनी घाईघाईने ठराव मंजूर केल्यावर त्यावर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात अशा ठरावावर चर्चा करता येणार नाही, असे सांगत विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळून लावली. उपमुख्यमंत्री म्हणाले, ठरावावर चर्चा होत नाही. होणार नाही आणि झालेली नाही. या पूर्वीही अनेक जणांवर अनेक कारणांमुळे अशी कारवाई झालेली आहे. त्यावेळी ठरावावर चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे निलंबनाच्या या ठरावावर चर्चा होणार नाही. ठरावावर मतदान घेण्यात येते. त्याप्रमाणे मतदान घेण्यात आले आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई नियमानुसार झालेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.       

सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक!

निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक आहे. विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे. कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेचे हित आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.