सत्ताधाऱ्यांकडून परंपरा आणि नियमांचे उल्लंघन, राहुल यांना बोलू न दिल्याने विरोधकांचा संताप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात बोलू दिले नाही. यावरून विरोधकांनी पत्राद्वारे ओम बिर्ला यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांकडून परंपरा, संस्कृती आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ओम बिर्ला यांनी काँग्रेस नेत्याला नियमांचे पालन करण्यास सांगितले. परंतु, त्यांच्या वाक्याचे राजकारण केले गेले, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने आज शून्य प्रहरादरम्यान लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांच्या राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केल्याची माहिती काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. लोकसभा अध्यक्षांनी नियम 349 चा हवाला दिला. परंतु, कोणत्या घटनेसाठी त्यांनी या नियमाचा हवाला दिला हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाचे सभागृहाबाहेर भाजपाच्या आयटी सेलकडून राजकारण केले गेले, असा आरोप गोगोई यांनी केला.

राहुल गांधी यांच्यानंतर पप्पू यादव यांना सुनावले

सभागृहात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नियमांचे पालन करण्याची सूचना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी केली. त्यानंतर आज अपक्ष खासदार पप्पू यादव यांना बिर्ला यांनी सुनावले. पप्पू यादव हे पेंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते. ते पाहून लोकसभा अध्यक्षांनी अशाप्रकारे सभागृहात कुणाच्याही खांद्यावर हात ठेवून बोलता येणार नाही, असे बिर्ला यांनी पप्पू यादव यांना बजावले.