राज्यपालांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा! विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार सुनील केंदार यांना शिक्षा ठोठावल्यावर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी आणि आमदारकी रद्द करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होऊनही मुंडेना सत्ताधाऱ्यांनी अभय दिले. आता कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पण त्यांनाही अभय दिले जात आहे. त्यामुळे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी माणिक कोकाटे यांचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करावी या मागणी विरोधकांनी केली आहे.

मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची 24 तासांत आमदारकी रद्द केली. आता कृषी मंत्री माणिक कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहेत, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या समाज माध्यमातून केला.

रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्राr यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपने नैतिकतेला हरताळ फासला आहे. माणिक कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. आता राज्यपालांनीच या प्रकरणात लक्ष घालून कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.