
राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्कार, ढासळती कायदा व सुव्यवस्था, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांची बेजबाबदार वक्तव्ये, कर्जमाफी, हमीभाव, एसटी महामंडळातील भ्रष्टाचार, धारावीची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा प्रकार, 50 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्याचा प्रयत्न, ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मुद्दय़ांवर महायुती सरकार अतिशय असंवेदनशील आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर आज बहिष्कार घातला. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, स्वतः अंबादास दानवे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार शिरीश कुमार नाईक उपस्थित होते.
सत्ताधाऱयांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सरकार हे शेतकरीविरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्नकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
बहिष्कार कायम
सत्ताधारी व विरोधक यांच्यातील परंपरा, संस्कृती लोप पावत चाललेली आहे, जोपर्यंत हा संवाद होत नाही तोपर्यंत चहापानावर बहिष्कार राहील, अशी आमची भूमिका असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अर्थ नसलेला अर्थसंकल्प
सरकारचा हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प अधिवेशन आहे. केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा डोबल अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या वेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न यंदाही होईल. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून प्रथा व परंपरा यात विसंवाद असल्याची टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली.
मंत्र्यांचा राजीनामा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळून आले तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. स्वारगेट एसटी बस डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर निषेध करण्याऐवजी गृह राज्यमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केले असून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.
‘शक्ती’ कायदा अंमलबजावणीत अपयश
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पुणे, मुंबई नागपूरसारख्या शहरांमध्ये चोरी, दरोडे, खून, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले, पण आरोप कृष्णा आंधळेला पकडण्यात अपयश आले आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर गृह राज्यमंत्र्यांनी अतिशय बेजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्य केले आहे, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. वाहनांच्या नवीन प्लेट नंबरसाठी इतर राज्यांच्या तुलनेत आकारण्यात येत असलेले जादा शुल्क, कृषी विभागात बदल्यांसाठी झालेला भ्रष्टाचार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता, ‘लाडकी बहीण योजने’त सुरू असलेली कपात, यावरून दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले.
कायद्याचा धाकच उरला नाही – आदित्य ठाकरे
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होते हे दुर्दैवी आहे. खुन्यांचे आका, दाऊद, इक्बाल मिर्चीसोबत भागीदारी असलेले सत्ताधाऱयांसोबत मांडीला मांडी लावून पॅबिनेटमध्ये बसतात, गुन्हेगारच आपल्या पक्षात कसा येईल या विचारातून राजकारण सुरू आहे. मग गुन्हेगारांना कायद्याचा धाक कसा राहील, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंडे यांचा राजीनामा अजितदादांकडे?
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला असून अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते जाहीर केले जाणार आहे अशी आज जोरदार चर्चा होती. ते उद्या सकाळी राजीनामा देतील असा दावा करुणा मुंडे यांनी केला. दरम्यान, आज सरकारच्या चहापानावेळी अजित पवार यांनी मुंडे यांच्याशी बोलणेही टाळले.