हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने सरकारी रुग्णालयांना नकली औषधांचा पुरवठा झाल्याच्या प्रकरणावर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सरकारवर जनतेच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप करण्यात आला. ‘बनावट सरकार हाय हाय’, ‘बनावट औषध हाय हाय’चे नारे देत विधान भवन परिसर दणाणून सोडला.
‘नकली औषध, नकली सरकार आणि बनावटी बहुमत, बनावटी औषध’ अशा घोषणांनी आमदारांनी सरकारचा निषेध केला. यावेळी दानवे यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षापासून सरकारी रुग्णालयांमध्ये पाच कंपन्यांकडून नकली औषधांचा पुरवठा करण्यात आला. या कंपन्यांची माहिती न तपासता सरकारने त्यांना औषध पुरवठ्याचे कंत्राट दिले.
दानवे म्हणाले, ‘सतर्क डॉक्टरांनी या नकली औषधांची ओळख पटवून त्यांचा वापर थांबवला, पण सरकारने वेळीच कारवाई केली नाही. तक्रारी असूनही दीड वर्षापासून चौकशी झाली नाही. ही राज्याच्या प्रशासनाची अकार्यक्षमता आणि बेफिकिरी दर्शवते.’ ‘ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला त्यांची कोणतीही नोंद नाही. त्या कंपन्यांची वेबसाईटही अस्तित्वात नाही. तरीही त्यांना कंत्राट कसे दिले गेले? संबंधित मंत्र्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’
60 दिवसांत चौकशी करा
दानवे यांनी 60 दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि जर चौकशी झाली नाही तर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला. ‘सरकार लोकांच्या जिवाशी खेळत आहे, असे ते म्हणाले. या आंदोलनात आमदार वरुण सरदेसाई, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह आघाडीचे आमदार सहभागी झाले होते.