म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी मार्चमध्ये जाहिरात काढण्यात आली होती. यातील 61 दुकानांना अर्जदारांचा शून्य प्रतिसाद मिळाला. विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या या दुकानांच्या विक्रीसाठी म्हाडाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या दुकानांचा लिलावासाठी जाहिरात द्यायची की ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर दुकानांची विक्री करायची याबाबत सध्या मुंबई मंडळाकडून चाचपणी सुरू आहे.
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱया म्हाडातर्फे व्यावसायिक गाळेदेखील बांधण्यात येतात. अशा विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात काढली होती. यासाठी सुमारे 604 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. 173 पैकी 61 दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला. यात स्वदेशी मिल 3, मुलुंड गव्हाणपाडा 1, तुंगा पवई 2, चारकोप 10, मालवणी 31, बिंबीसार 5 आणि जोगेश्वरी येथील एका गाळय़ाचा समावेश आहे. याशिवाय सात ते आठ अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले होते. विक्रीअभावी धूळ खात पडलेल्या या दुकानांमुळे म्हाडाचा निधी अडकून पडतो तसेच या दुकानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी म्हाडाला पैसे खर्च करावे लागतात.