
देशात नोकऱ्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत वाढलेल्या महागाईप्रमाणे पगार मिळत नाही, असे मत निती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद विरमानी यांनी व्यक्त केले आहे. नोकरी आणि कौशल्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते, असेही विरमानी यांनी म्हटले आहे. जगाच्या तुलनेत लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थानकडे मोठी संधी आहे. त्याचा लाभ घेण्याची गरज असून त्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण यांची गुणवत्ता यामध्ये सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीएलएफएस अर्थात पिरीयोडीक लेबर फोर्स सर्व्हेनुसार गेल्या सात वर्षांत कामगारांची संख्या वाढत आहे. त्यानुसार नोकऱ्यांमध्येही वाढ होत आहे. यात चढ आणि उतारही होत आहेत. परंतु, महागाईप्रमाणे पगार मिळत नाही, याकडे डॉ. विरमानी यांनी लक्ष वेधले आहे.