
जगभरात सध्या एआयचा बोलबाला आहे. आपल्याला ठाऊक आहे की, चॅटजीपीटी हा ओपनआयचा चॅटबॉट आहे. चॅटजीपीटीवर आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. सध्या लाखो युजर्स याचा वापर करत आहेत. चॅटजीपीटीवर उत्तरे मिळवण्यासाठी आपण कधी ‘प्लीज’ म्हणतो, तर उत्तरे मिळाल्यानंतर ‘थँक्यू’ म्हणतो. युजर्सचे असे विनम्रतापूर्वक ‘प्लीज’, ‘थंक्यू’ म्हणणे हा ओपनएआय कंपनीसाठी खर्चिक ठरते. अगदी या शब्दांचा कंपनीवर लाखो डॉलर्सचा भार पडतो. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीच हा खुलासा केला.
‘एक्स’वरील एका युजर्सने विचारणा केली की, ओपनएआय कंपनी प्लीज, थँक्यू या शब्दांच्या देवाणघेवाणीवर किती खर्च करते? त्यावर उत्तर देताना सॅम ऑल्टमन म्हणाले की, 100 लाख डॉलर्सहून जास्त खर्च केले आहेत. हे दोन शब्द क्षुल्लक वाटत असले तरी, अशा शब्दांचा अर्थ लावणे आणि त्याचा प्रतिसाद निर्माण करणे गरजेचे असते. यामुळे संगणकीय भार वाढतो. परिणामी ऊर्जेचा वापर आणि खर्च वाढतो.
एआयला लागते जास्त उर्जा
एआय डेटा सेंटर्सद्वारे वापरली जाणारी वीज, जागतिक वीज वापराच्या सुमारे दोन टक्के आहे. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, प्रत्येक चॅटजीपीटी-4 क्वेरीसाठी अंदाजे 2.9 वॅट-तास वीज लागते, जी स्टँडर्ड गुगल सर्चपेक्षा सुमारे दहा पट जास्त आहे. ओपनएआय दररोज एक अब्जाहून अधिक क्वेरी हाताळत असल्याने याचा अर्थ अंदाजे दररोज ताशी 2.9 दशलक्ष किलोवॅट ऊर्जेचा वापर होतो.