शिवसेनेच्या पुढाकाराने मुंबईतील महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा

सध्याच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा (ओपन जिम) सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या खासदार निधीतून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील रुईया, रुपारेल तसेच खालसा महाविद्यालयात आणि वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या आमदार निधीतून वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे.

दरम्यान, महाविद्यालयातील ‘एनसीसी’चे विद्यार्थी आणि खेळाडूंना या खुल्या व्यायामशाळेचा फायदा होणार आहे. दैनंदिन तसेच विविध क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने ही खुली व्यायामशाळा उपयुक्त ठरणार आहे. संपूर्णतः निःशुल्क असणाऱया या खुल्या व्यायामशाळेत विद्यार्थांना व्यायाम आणि शारीरिक कसरती करण्यासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या या खुल्या व्यायामशाळांचे काम अंतिम टप्प्यात असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी युवासेनेचे मुंबई विद्यापीठातील अधिसभा सदस्य प्रदीप सावंत आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबेकर यांच्याकडून खुली व्यायामशाळा उभारण्याच्या कामाची पाहणी करण्यात येत आहे.

‘विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संकल्पनेला पुढे नेत माझ्या मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा (ओपन जिम) उभारून महाविद्यालयांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 3-4 महाविद्यालयांमध्ये ही खुली व्यायामशाळा उभारली जात असून आगामी काळात माझ्या मतदारसंघातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुली व्यायामशाळा उभारण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत’, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.