एकाच दिवसात कसोटी, वनडे आणि टी-20 सामना खेळण्याची धमक फक्त टीम इंडियामध्ये; ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाची स्तुतीसुमने

रोहितसेनेने दुबईमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाला हरवणे कोणत्याच संघाला जमले नाही. 2024 मध्ये पार पडलेला टी20 वर्ल्डकप सुद्धा रोहितच्या नेतृत्वात संघाने उंचावला. त्यामुळे सध्याच्या घडीला जगातील बाप संघ म्हणून टीम इंडियाच्या नावाचा उल्लेख केला जातो. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सुद्धा टीम इंडियाच्या दमदार खेळाच कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अंमली पदार्थांच्या तस्करीत आढळला दोषी

सध्याच्या घडीला टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत आहे. वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे. वनडे आणि टी-20 फॉरमॅटचा विचार केल्यास टीम इंडिया ICC रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तस कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या धमाकेदार प्रदर्शनाबाबत मिचेल स्टार्कने Fanatics TV या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की, जे इतर देशांना जमनार नाही, ते टीम इंडिया करू शकते. टीम इंडिया असा एकमेव संघ आहे, जो एकाच दिवसात कसोटी, वनडे आणि टी20 सामने खेळण्याची धमक ठेवतो. टीम इंडिया एकाच दिवसात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, इंग्लंडविरुद्ध वनडे आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 सामना खेळू शकतो, असे स्टार्क म्हणाला आहे.