अनुकंपा नोकरीचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देता येईल. त्याच्या सेवा समाप्तीनंतर कुटुंबातील अन्य सदस्याला अनुकंपा नोकरी देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. अनुपिंदर सिंह ग्रेवाल व न्या. लपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. नोकरी करणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट येते. त्यातून सावरण्यासाठी अन्य सदस्याला अनुकंपा नोकरी दिली जाते. मात्र त्या सदस्याच्या सेवा समाप्तीनंतर दुसऱ्या कुटुंब सदस्याने अनुकंपा नोकरीचा दावा करणे अयोग्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
अहमदगड येथील बाजार समितीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱया अधिकाऱयाचा 2012 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा कासिफ खानला 2013 मध्ये अनुकंपा नोकरी देण्यात आली. खान हा कामावर सतत गैरहजर राहायचा. त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्याची चौकशी करण्यात आली. अखेर 2016 मध्ये त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याच्या भावाने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. बाजार समितीने अनुकंपा नाकारली. त्याविरोधात त्याने याचिका केली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
अनुकंपा नोकरी हा मूलभूत अधिकार नाही. मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी एका सदस्याला अनुकंपा नोकरी दिली जाते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचिकाकर्ते सोबिया बनाम यांच्या भावाला अनुकंपा नोकरी दिली गेली होती. त्यामुळे कुटुंबातील दुसऱया सदस्याला अनुकंपा नोकरी देता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.