राज्यात गद्दारी करून सत्तेत आल्यानंतर मिंधे सरकारने तीन वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याची घोषणा मोठा गाजावाजा करीत केली असली तरी आतापर्यंत अर्धी कामेदेखील पूर्ण झालेली नाहीत. दोन टप्प्यांमध्ये हे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील 698 कामांपैकी केवळ 187 कामे म्हणजेच केवळ 26 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील 1420 रस्त्यांच्या कामांपैकी केवळ 720 कामे डिसेंबर 2024मध्ये सुरू करण्यात आली आहेत. रस्ते कामाचा आवाका पाहता ही सर्व कामे पूर्ण होण्यास 2027 उजाडणार असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे मुंबईकरांना अजून दोन वर्षे खड्डयातूनच प्रवास करावा लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत 2020 कि.मी. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठया प्रमाणावर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेला मोठया टीकेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांत सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची ‘भीमगर्जना’ केली होती. मात्र या घोषणेनुसार अडीच वर्षे उलटून दुसऱ्यांदा सरकार आले तरी अर्धी कामेदेखील झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे होणार तरी कधी, असा सवाल मुंबईकरांमधून पालिका प्रशासनाला विचारला जात आहे.
पालिका म्हणते…
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 2024मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक्सेस कंट्रोल प्रोजेक्टचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पा अंतर्गत पूर्व द्रुतगती मार्गावरील एक जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील तीन जंक्शनवर सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय वाहतूक विभागाकडून पार्किंग अॅप विकसित करण्यात आले असून वाहतूकदारांना आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हवा-ध्वनी प्रदूषणाचाही ताप
मुंबईत सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. शिवाय कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे रहिवाशीदेखील हैराण होत आहेत. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकर हवालदिल होत आहेत.
संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडी
मिंध्यांच्या आदेशानुसार पालिकेने संपूर्ण मुंबईत एकाच वेळी शेकडो रस्त्यांची कामे सुरू केल्याने बहुतांशी ठिकाणी खोदकाम, बॅरिगेट्स लावणे, वाहतूक वळवणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत सध्या वाहतूक कोंडी होत असून काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासन्तास रखडपट्टी होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अडथळय़ांची शर्यत पार करत मुंबईकरांना प्रवास करावा लागत आहे.
अशी आहे सद्यस्थिती
पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या 698 (324 कि.मी.) रस्त्यांच्या कामांपैकी केवळ 187 कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
दुसऱ्या टप्प्यात 1420 रस्त्यांचे (377 कि.मी.) काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन असून यातील 720 कामे डिसेंबर 2024मध्ये सुरू करण्यात आली आहेत.
टप्पा-1मधील 75 टक्के कामे व टप्पा दोनमधील 50 टक्के कामे जून 2025मध्ये पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. शिल्लक सर्व कामे 2027पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.