15 मेपासून मुंबईत 15 टक्के पाणीकपात, तलावांमध्ये फक्त 25 टक्के पाणी; पालिकेकडून पाणीपुरवठा नियोजनाला सुरुवात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठय़ात कमालीची घट झाली असून एकूण साठा 3,65,883 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 25 टक्केच उरला आहे. यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 मेपर्यंत उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन 10 ते 15 टक्के पाणीकपात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे वाढलेले औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. शिवाय क्लायमेंट चेंजमुळे पाऊस लांबत असल्याने  मुंबईत गेल्या काही वर्षांपासून 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्याची नामुष्की पालिकेवर येत आहे. गतवर्षी तर पाणीसाठा 7 टक्क्यांवर आल्याने पाण्याच्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने पालिकेने पाणीकपात लागू केली होती.

गेल्या तीन वर्षांतील 28 एप्रिलचा जलसाठा

2025     365883 दशलक्ष लिटर   25.28 टक्के

2024     289394 दशलक्ष लिटर   19.99 टक्के

2023     378475 दशलक्ष लिटर   26.15 टक्के

आता मदार राखीव कोटय़ावर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा घटल्याने पालिकेने राज्य सरकारकडे राखीव कोटय़ाची मागणी केली होती. याला सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीमधील वैतरणामधून 68 हजार दशलक्ष लिटर आणि भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर असा राखीव पाण्याचा कोटा पालिकेला मिळाला आहे.

तर मुंबईत पाणीटंचाई

सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये एपूण 3,65,883  दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. दररोजचा होणारा पाणीपुरवठा पाहता हे पाणी पुढील 95 दिवस पुरणारे आहे.

यातच गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे झपाटय़ाने वाढणारे बाष्पीभवन आणि जून-जुलैमध्ये पावसाने दडी मारली तर मुंबईसाठी पाण्याचे टेन्शन निर्माण होऊ शकते.

असा आहे सध्याचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा 52255 दशलक्ष लिटर

मोडक सागर   32783 दशलक्ष लिटर

तानसा           30075 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा  57678 दशलक्ष लिटर

भातसा           179801 दशलक्ष लिटर

विहार             10290 दशलक्ष लिटर

तुळशी           3001 दशलक्ष लिटर

एकूण             3,65,883 दशलक्ष लिटर