नवी मुंबईत ‘कॉर्पोरेट’ सेक्स रॅकेट; गुन्हे शाखेचा छापा, आठ पीडित तरुणींची सुटका

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे सुरू असलेले ऑनलाइन सेक्स रॅकेट नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणारे दलाल ग्राहकांचा शोध घ्यायचे आणि नंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर चॅटिंग केली जायची. त्यानंतर तरुणींना हॉटेलवर पाठवले जायचे. त्या बदल्यात येणाऱ्या मोबदल्याची सहा भागात वाटणी केली जात होती. मात्र पोलिसांनी दोन दलालांच्या मुसक्या आवळून आठ पीडित तरुणींची सुटका केली आहे.

नवी मुंबई शहरात हायफाय सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून नेरूळ येथील रिव्हर पार्क हॉटेलवर छापा मारून हे रॅकेट उघडकीस आणले. त्यानंतर शिरवणे येथील सृष्टी इमारतीमधून आठ मुलींची सुटका केली. याप्रकरणी विष्णू यादव आणि इंद्रजीत प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शंभू उपाध्याय हा फरारी झाला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, शरद भरगुडे, अनिल मांडाळे यांनी केली आहे.

वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांचे दलाल सहा वाटण्या करीत होते. पीडित तरुणी, लॉजचा मॅनेजर, तरुणीला घेऊन जाणारा रिक्षाचालक, तरुणीशी संपर्क करून देणारा छोटू, ऑनलाइन साईट चालवणारा इसम यांना वाटणी केल्यानंतर उरलेले पैसे दलाल घेत होते. याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला होता.