
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन झाले आहे. परंतु, काद्यांला भाव न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. महागडी औषधे, खतं आणि मजुरीबरोबरच वाहतुकीसाठी झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असलेले पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. नगर तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर असून, तालुक्याला कांद्याचे पठार म्हणून नवीन ओळख मिळत आहे. मात्र, कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.
लाल कांदा, रांगडा कांदा, गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अनेक जिरायती क्षेत्र सिंचनाखाली आणत शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. चालूवर्षी साधारणपणे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर रांगडा व गावरान कांद्याची लागवड करण्यात आली होती. खराब हवामान, पडणारे दव अन् पाण्याची कमतरता यावर मात करत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जेऊर पट्टा कांदा उत्पादनात राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे जेऊर पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनात घट झाली असली, तरी तालुक्यातील इतर भागांमध्ये विक्रमी कांदा उत्पादन होणार आहे. गावरान कांदा काढणीला आला असून, अशातच कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर,
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत कांदापिकासाठी 5 ते 6 हजार रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळत होता. परंतु सद्यस्थितीत दीड हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदाविक्री होत असल्याची माहिती मिळत आहे.
कांद्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात असून, तालुका बांधावरील कांदाखरेदीबाबत जिल्ह्याचे केंद्रबिंदू बनला आहे. परंतु कांद्याचे भाव गडगडल्याने बांधावरील खरेदीही काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. बांधावरील खरेदी बाराशे ते चौदाशे रुपये क्विंटलप्रमाणे चालू आहे. शेतकऱ्यांनी खर्च करून कांद्याचे उत्पादन घेण्याच्या केलेल्या प्रयत्नावर दराअभावी पाणी फिरणार आहे. झालेला खर्चही वसूल होणे अवघड आहे. महागड्या औषधांची फवारणी तसेच मजुरीचा झालेला खर्च व मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसणार नाही.
येथील अनेक व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करून वखारीमध्ये साठवणूक करून ठेवला होता. परंतु कांद्याचे दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांनाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांत कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झाल्याची चर्चा बाजारपेठेत आहे. एकंदरीत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे सर्वच कांदा उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.
निर्यातीत घट
नगर तालुक्यातील कांदा देशांतर्गत मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, ओडिशा या राज्यांनी, तर परदेशात दुबई, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, सिंगापूर या देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो. परंतु कर्नाटक, तसेच मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्याने देशांतर्गत होणाऱ्या निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाल्याचे दिसून येते.