
कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतो आणि भाव पडतात असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कांद्याचे भाव पडण्यासाठी कोकाटे यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांनाच जबाबदार धरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी माफीही मागितली होती.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना कोकाटे म्हणाले की, शेतकरी म्हणतो की शेतकरी परवडत नाही. नवीन पिढी शेती करण्यासाठी पुढे येत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न निघाल्यास नवीन पिढी शेतीत येईल असे कोकाटे म्हणाले. तसेच कांद्याची लागवड आणि निर्यातबंदी हे दरवर्षी बदलणारे सुत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला कांद्याला दोन ते पाच हजार रुपये भाव मिळाला तर सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात. हा चुकीचा संदेश आहे. शेतकऱ्यांनी दुप्पट, तिप्पट 50 पट कांद्याचे पीक घेतले तर कांद्याचे भाव पडतात. म्हणून एखाद्या पिकाची किती लागवड करावी यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असे कोकाटे म्हणाले.