
संपूर्ण पुरंदर व बारामती तालुक्यांतील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (15 रोजी) दुपारी एक वाजता झालेल्या लिलावामध्ये कांद्याला तीन हजार 260 रुपये प्रतिक्विंटलला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत 121 क्विंटल कांद्याची आवक झाली.
नीरा येथील बाजार समितीमधील कांदा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. काही वर्षांपासून कांदा बाजार बंद पडलेला होता. आत्ताच्या नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गेल्या वर्षी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा कांदा लिलाव सुरू केला. त्यावेळी नीरा व परिसरातील शेतकऱ्यांनी जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे व चांगला भाव मिळत असल्यामुळे नीरा बाजार समितीत लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. या वर्षीदेखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणू लागले आहेत.
शनिवारी दुपारी एक वाजता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पार पडले. यावेळी 1 नंबर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार 711 रुपये, साधारण दर तीन हजार 15 रुपये प्रतिक्विंटल, तर जास्तीत जास्त दर तीन हजार 260 रुपये मिळाला.
दोन नंबरच्या कांद्याला कमीत कमी दर दोन हजार 500 रुपये, साधारण दर दोन हजार 650 रुपये प्रतिक्विंटल, तर
जास्तीत जास्त दर दोन हजार 800 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. गोल्टी कांद्याला कमीत कमी दर दोन हजार 190 रुपये, साधारण दर दोन हजार 345 रुपये प्रतिक्विंटल, तर जास्तीत जास्त दर दोन हजार 500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. दुंडा कांद्याला कमीत कमी दर दोन हजार 100 रुपये, साधारण दर दोन हजार 175 रुपये प्रतिक्विंटल, तर जास्तीत जास्त दर दोन हजार 251 रुपये प्रतिक्विंटल मिळाला असल्याची माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
दर शनिवारी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या कांदा लिलावास नीरा व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.