ग्रॅण्ट रोडमध्ये ‘रुबिनीसा मंझील’चा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू; चार जण जखमी, एकाची प्रकृती अत्यवस्थ

ग्रॅण्ट रोड येथील रुबिनीसा मंझील या चार मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. वीरा वाडिया (80) असे या मृत महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सिद्धेश पालिजा (30) याची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. या दुर्घटनेत चौथ्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाने उत्तुंग शिडीच्या सहाय्याने सुटका केली.

ग्रॅण्ट रोड पश्चिम येथील स्लेटर रोडवरील चार मजली रुबिनीसा मंझील या म्हाडाच्या इमारतीच्या बाल्कनीचा आणि तिसऱया व चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोसळला. यामध्ये आठजण चौथ्या मजल्यावर अडकले होते. त्यांचे अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात आले. या घटनेत ढिगाऱयाखाली  एकूण चार जण दबले. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

धोकादायक इमारतीला म्हाडाने दिली होती नोटीस

80 ते 100 वर्षे जुन्या या इमारतीला म्हाडाने यापूर्वीच ‘धोकादायक’ जाहीर केले होते. या इमारतीची वारंवार दुरुस्ती करण्यात आल्याने ती आता दुरुस्तीपलीकडे गेली होती. त्यामुळे  ही धोकादायक इमारत रिक्त करण्यासाठी आणि तिचा लवकरात लवकर पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडून रहिवासी आणि जागा मालकांना आतापर्यंत चार वेळा नोटीस बजावली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे ‘म्हाडा’चे म्हणणे आहे. दरम्यान, म्हाडाकडून या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था संतोष नगर, ओशिवरा येथे करण्यात आली आहे.