ताटात काही टाकू नये असे वडीलधारी सांगतात. अनेक जण त्याप्रमाणे वागतात. अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतात. पण सगळेच असे वागताना दिसत नाहीत. जगभरात मोठय़ा प्रमाणात अन्न वाया जाते. जागतिक पातळीवर अन्नाची नासाडी एक तृतीयांश होत असल्याची गंभीर बाब समोर आलीय. ही अन्नाची नासाडी 50 टक्के जरी थांबली, तर 15 कोटी लोकांचे पोट भरले जाईल.
संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटना व आर्थिक सहयोग विकास संघटना यांनी अन्नाच्या नासाडीवर संयुक्त अहवाल तयार केलाय. अहवालानुसार, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत अन्न वाया जाते. अनेकदा ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असते. खाद्यपदार्थांची नासाडी कमी केली तर जागतिक स्तरावर अधिक लोकांची अन्नाची गरज भागवली जाऊ शकते. परिणामी, खाद्य उपलब्धता वाढून किमती कमी होऊ शकतात.
ही केवळ अन्नाची नासाडी नसते, तर पिके घेण्यासाठी लागणारी जमीन, पाणी, ऊर्जा आणि जेवण बनवण्यासाठी लागणाऱया साहित्याची नासाडी असते. त्यातून ग्रीन हाऊस गॅसेसचे अधिक प्रमाणत उत्सर्जन होते. अन्न वाया जाण्याचे प्रमाण निम्मे कमी केले, तर कृषी क्षेत्रातील ग्रीन हाऊसचे प्रमाण चार टक्के कमी केले जाऊ शकते.
l 2021-23 दरम्यान नासाडी झालेल्या अन्नामध्ये सर्वाधिक हिस्सा फळभाज्यांचा होता. अमेरिकेत तर एक तृतीयांश भोजन खाल्ले जात नाही.
l 2030 पर्यंत खाद्यपदार्थांचे नुकसान निम्मे कमी केले तर गरीब देशांतील 10 टक्के लोकांना भोजन मिळेल. उच्च आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 4 टक्क्यांहून अधिक भोजन मिळेल.
l वाया घालवलेला प्रत्येक घास कुणाचे तरी पोट भरू शकतो. संयुक्त राष्ट्राने 2030 पर्यंत अन्नाची नासाडी 50 टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.