झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, एक जवान शहीद; दुसरा गंभीर जखमी

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक जवान शहीद झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात चाईबासा येथे ही घटना घडली. जखमी जवानावर रांचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील धन असे शहीद जवानाचे नाव असून तो झारखंडमधील जग्वार येथील रहिवासी आहे.

चाईबासा येथे नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब पेरले होते. या आईडीचा शनिवारी स्फोट होऊन त्यात सुनील धन आणि कोब्रा बटालियनचे विष्णु सैनी दोघे जखमी झाले. दोघांना तात्काळ एअरलिफ्ट करून रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुनील धन यांना मृत घोषित केले.

विष्णु सैनी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे झारखंडचे डीजीपी चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले. या घटनेनंतर नक्षलवाद्यांच्या शोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.