शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वन नेशन वन इलेक्शनवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर खरमरीत टीका केली. वन नेशन वन इलेक्शन विधेकावर बहुमतापेक्षा कमी आकडा, हा भाजपचा नैतिक पराभव आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
भाजपने जरी वन नेशन वन इलेक्शन विधेकावर विजय प्राप्त केला असला तरी बहुमता पेक्षा आकडा त्यांच्याकडे कमी आहे. 272 चं बहुमत असतानाही 269 वर थांबले. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. कोण गैरहजर राहिले हा पुढचा प्रश्न आहे. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांची व्हिप न पाळण्याइतकी हिंमत हळूहळू स्वाभिमानी भाजप खासदारांकडे येताना दिसतेय. आणि हीच हिंमत भविष्यात नरेंद्र मोदी यांना याच कार्यकाळातून सत्तेवरनं उलथवून टाकेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
आम्ही वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला आहे. हा लोकशाही संघराज्य रचनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. एका व्यक्तीच्या हातात राज्य आणि देशाची सत्ता राहील, त्यासाठी विधेयक आणले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
तुम्ही संविधानावर चर्चा करताय, संविधानावर बोला. देशाच्या परिस्थितीवर बोला. 70 वर्षांपूर्वी नेहरूंनी काय केलं आणि काय केलं नाही? यावर किती काळ दळण दळणार आहात तुम्ही? तुमच्या स्वतःकडे बोलण्यासारखं आहे की नाही? पंडित नेहरू हे महान नेते होते, भारतीय जनता पक्षाला त्यांच्याबद्दल असूया आहे की आपण नेहरूंसारखं महान होऊ शकलो नाही, आपण नेहरूंसारखं काम करू शकलो नाही. आज ही लोक नेहरू नेहरू करतात ही त्यांच्या मनातली असूया आहे, असे संजय राऊत यांनी भाजपला सुनावले.