‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक देशाच्या लोकशाहीच्या सार्वभौमत्वावरचा घाला आहे. या विधेयकामुळे राज्यांचे अधिकारांचा संकोच होईल. प्रत्येक राज्याला अस्मिता असते. या अस्मिता संपविण्याचे काम हे विधेयक अमलात आले तर होईल, असे सांगत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या विधेयकाला विरोध करत जोरदार हल्ला केला.
लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावरीच चर्चेत सहभागी होताना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी या विधेयकाला विरोध करण्यामागची शिवसेनेची भूमिका विशद केली. आपल्या देशाने संघराज्य प्रणाली अमलात आणली आहे. या संघराज्य प्रणालीला तसेच देशाच्या सार्वभौमतवाला या विधेयकामुळे धक्का बसेल, असा गंभीर इशारा खासदार देसाई यांनी दिला.
‘वन नेशन, वन इलेक्शन’सारखे विधेयक आणण्यापेक्षा सरकारने इलेक्शन कमिशनच्या कामकाजाच्या प्रक्रियेत बदल घडवून आणावेत, अशी मागणी करत खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयुक्तांची मागणी सरकारने करण्याऐवजी ती जनतेतून केली जावी, असे निक्षून सांगितले. निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणे काम करतो हे शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून दिसून येते, असा टोलाही खासदार देसाई यांनी यावेळी लगावला. शिवसेना नेहमीच देशाच्या अखंडत्वासाठी काम करते. त्यामुळे आमचा या विधेयकाला विरोध आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.