एका व्यक्तीला ‘सुपरमॅन’ व्हायचंय, तो ‘देव’ही बनू पाहतो! सरसंघचालक मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाची देशपातळीवर चर्चा सुरू आहे. झारखंडमधील गुमला येथे ‘विकास भारती या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी “माणसाला सुपरमॅन व्हायचं असतं, तो देवही बनू पाहतो” असे विधान केले. त्यांचा रोख नक्की कुणाकडे यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मोहन भागवत म्हणाले की, प्रगतीला, विकासाला कोणताही अंत नाही. जेवढी प्रगती करण्याचा विचार केला होता, तिथपर्यंत आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसांमध्ये माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. स्वत:च्या बाह्य आणि अंतर्गत प्रगतीसाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. प्रत्येकाने मानवतेसाठी अथक प्रयत्न करायला हवेत.

हे वाचा – राजा चुकला तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं! सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले

माणसाच्या महत्त्वाकांक्षा कधीच संपत नाहीत. एका व्यक्तीला सुपरमॅन व्हायचे आहे. त्यानंतर तो स्वत:त देवही पाहू लागतो. मात्र देव हे विश्वरुप आहे. तिथे आणि त्यापुढे कुणी असेल का? असे सूचक विधान मोहन भागवत यांनी केले आहे.

दरम्यान, मोहन भागवत यांच्या विधानाचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याला कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप आणि आरएसएसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले होते. मोहन भागवत यांच्यासह आरएसएसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपला आरसा दाखवण्याचे काम केले होते.

‘सुपरमॅन’च्या पायाखालची बहुमताची सतरंजी ‘कॉमनमॅन’नं खेचली, भागवतांच्या विधानावर भाजपनं चिंतन करावं! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरसंघचालकांनी एका खऱ्या सेवकात अहंकार नसतो असे विधान केले होते. त्यानंतर मणिपूरच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मणिपूर वर्षभरापासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. गत 10 वर्ष तिथे शांतता होती. पण अचानक हिंसाचार सुरू झाला. तिथे तिथे शांतता स्थापित करण्यासाठी पावलं उचलण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे भागवत म्हणाले होते.

मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान

भागवतांच्या विधानानंतर काँग्रेसचा मोदींवर निशाणा

दरम्यान, मोहन भागवत यांच्या विधानानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर भागवत यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. मला विश्वास आहे की स्वयंघोषित नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना नागपूर येथून लोक कल्याण मार्गावर डागलेल्या या नवीन अग्नी क्षेपणास्त्राची बातमी नक्तीच मिळाली असेल, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला.