कधी कधी काही घटना घडतात, त्याला… सैफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला. या घटनेन सिनेसृष्टी हादरली आहे. सिने स्टारही जिथे सुरक्षित नाहीत तिथे सामान्यांची काय स्थिती अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागली आहे. विरोधकांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाईट गोष्ट एकच आहे की मुंबईची कायदा-सुव्यवस्था आता किती ढासळतेय याचं हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याच भागात एक हत्या झाली होती. आणि आता हा दुसरा हल्ला. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृहखातं त्यांच्याकडे आहे. त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्यानं बघावं’, असे शरद पवार म्हणाले.

तर काँग्रेसकडूनही महायुती सरकारला लक्ष्य करण्यात आलं. ‘पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे’, असा हल्लाबोल काँग्रेसने केला. महायुती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा व सुव्यवस्था उरलेली नसून राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत, असा घणाघात राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.

कधी कधी काही घटना घडतात, त्याला…

अशा प्रकारे चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘देशातल्या मेगा सिटीमध्ये सुरक्षित शहर मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे हे यासाठी म्हणणं योग्य होणार नाही कारण यामुळे मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार अधिक प्रयत्न करेल’, असं
देवेंद्र फडणवीस म्हणाले.