संघहितासाठी कर्णधार रोहित शर्मा उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सिडनी कसोटी संघाबाहेर असेल की सिडनी कसोटी त्याच्यासाठी निरोपाची कसोटी ठरेल, याबाबत हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा प्रारंभ पर्थ विजयासह करणाऱ्या जसप्रीत बुमराने मालिकेचा शेवट आणि वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचे एकमेव ध्येय समोर ठेवलेय. हिंदुस्थानचा संघ बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडक मालिकेत 1-2 ने दुहेरी पिछाडीवर आहे. सिडनी जिंकून मालिकेत बरोबरी साधून हिंदुस्थानला करंडक राखण्याची शेवटची संधी आहे. एवढेच नव्हे तर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी सिडनी कसोटी जिंकणे हाच एकमेव पर्याय हिंदुस्थानी संघासमोर उरला आहे. एक विजय हिंदुस्थानला दुहेरी यश मिळवून देणारा ठरू शकतो आणि यजमान ऑस्ट्रेलियाने सिडनी जिंकली पिंवा अनिर्णित राखली तर हिंदुस्थानी संघाचे डब्ल्यूटीसीतील आव्हान आपोआप संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा नववर्षाचा विजयारंभ संघासाठी निश्चितच स्फूर्तिदायक ठरू शकतो.
दीड महिन्याच्या दौऱयाची सांगता विजयाने करण्यासाठी यजमानच नव्हे तर हिंदुस्थानही उत्सुक आहे. एकीकडे मेलबर्न कसोटीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोधैर्य उंचावलेय, तर दुसरीकड़े हिंदुस्थानी संघ प्रचंड दडपणाखाली दिसतोय. कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरल्यामुळे उद्या नक्की कोण खेळणार याचा अंदाज पिंवा कल्पना खुद्द प्रशिक्षक गौतम गंभीरही देऊ शकले नाहीत. त्यामुळे उद्या हे वृत्त वाचेपर्यंत कसोटीत रोहित आहे की नाही याची कल्पना सर्वांना येईल. रोहितबद्दल साशंकता असली तरी आज सराव करताना असलेली त्याची देहबोली काही वेगळेच सांगून जात होती.
सिडनीत निरोप देण्याचीच चर्चा
फॉर्ममध्ये नसलेला रोहित संघहितासाठी कसोटी संघाबाहेर बसण्याचे अंदाज सारे वर्तवत असले तरी सिडनी कसोटीद्वारेच रोहितला निरोप देण्याच्या चर्चेने वातावरण चांगलेच तापले आहे. गेले वर्षभर अपयशाचा गर्तेत सापडलेल्या रोहितला वगळणे संघासाठी डोईजड झालेय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचा तारणहार असलेला रोहित आता संघासाठी एक ओझे बनला आहे. अशा स्थितीत त्याला वगळण्यावाचून पर्याय नसला तरी सिडनीतच त्याला निवृत्ती देण्याची चर्चा रंगलीय. कोणीही काहीही अंदाज बांधत असले तरी नेहमीच संघहितासाठी धडपडणारा रोहित सिडनीत न खेळताही निवृत्ती घेऊ शकतो, असे प्रामाणिक मत चाहत्यांनी बोलून दाखवले आहे.
सिडनी कसोटी संभाव्य उभय संघ
हिंदुस्थान ः यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जाडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, प्रसिध कृष्णा /हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया ः उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स पॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.
पहिला दिवस भिजण्याची शक्यता
मालिकेचा निकाल लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सिडनी कसोटीवर पावसाची वक्रदृष्टी पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकातील तिसऱया कसोटीत पावसाने वारंवार व्यत्यय आणला होता. परिणामतः हा कसोटी सामना अनिर्णितावस्थेत राहिला. आता सिडनीत कसोटीत पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस पडणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी 80 टक्के ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान हलक्या पावसाच्या सरी काही काळ खेळ थांबवू शकतात. मेलबर्नमध्येही अनेक तास ढगाळ वातावरण होते. मात्र जास्तीत जास्त काळ मैदानात सूर्य तळपणार असल्यामुळे मधल्या तीन दिवसांत पूर्ण खेळ होईल.
संघात सारेकाही ठीकठाक – गंभीर
संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गंभीर यांनी वरिष्ठ खेळाडूंना झापल्याचेही वृत्त लीक झाले होते. पण आज पत्रकार परिषदेत गंभीर यांनी स्पष्ट केले की, जे काही वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेय त्यात सत्यतेचा अभाव आहे. संघात कोणताही बेबनाव नाही आणि कोणताही वादही झालेला नाही. आमच्या बैठकीत इतकेच ठरले की, प्रत्येकाने आपले प्रामाणिकपणे योगदान द्यायला हवे. जर आपल्याला विजयी लक्ष्य गाठायचे असेल, काही चांगले करायचे असेल तर जोरदार प्रयत्न व्हायला हवेत, असा सल्ला खेळाडूंना दिल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले.
आकाश दीपच्या जागी प्रसिध?
दुखापतीमुळे आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाजच खेळविला जाणार असल्याचे संकेत गंभीर यांनी दिलेय. पण त्याच्या जागी प्रसिधला संधी दिली जाणार की पुन्हा हर्षित राणा खेळणार, हा सस्पेन्स पुन्हा कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शुबमन गिलचे संघातील स्थानही रोहितच्या सस्पेन्समुळे अनिश्चित मानले जातेय. पण गिल संघात असावा, असे संघव्यवस्थापनाला वाटत असले तरी उद्या नेमके कोणते बदल असतील ते खेळपट्टीचा अंदाज घेऊन च ठरवले जाणार आहे.
वेबस्टर पदार्पणासाठी सज्ज
मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरलेल्या अष्टपैलू मचेल मार्शला सिडनी कसोटीतून डच्चू देण्यात आल्यामुळे ब्यू वेबस्टरला पदार्पणासाठी सज्ज करण्यात आले आहे. मेलबर्न कसोटीतील विजयामुळे मनोधैर्य उंचावलेल्या संघात केवळ हाच एकमेव बदल केला जाणार असल्याचे पॅट कमिन्सने कसोटीच्या पूर्वसंध्येलाच जाहीर केले. उर्वरित दहा खेळाडू मेलबर्न कसोटीतीलच कायम असतील.