ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला कारची धडक, एकाचा मृत्यू; दोघे जखमी

दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्या तरुणांचा लोअर परळ येथील उड्डाणपुलावर अपघात झाला. एका कारने दिलेल्या धडकेत तिघेही तरुण गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने त्यातील एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष सिंह (20), कमलेश सिंह (22) आणि विशाल सिंह (21) असे तिघेजण सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी लोअर परळ उड्डाणपुलावरून सेनापती बापट मार्गच्या दिशेने टाटा कर्व कंपनीची कार जात होती. मातुल्य चौकात उजव्या बाजूला दुचाकी वळण घेत असताना कारने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे तिघेही तरुण रस्त्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली.

ही घटना कळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या तिघांना नायर इस्पितळात नेले, मात्र उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी आयुष सिंह याला मृत घोषित केले, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कर्व कारचा चालक मनीष सिंग (25) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीष हा टाटा कंपनीत टेस्ट ड्रायव्हरचे काम करत होता.