गोव्यात पर्यटकांच्या बोटीला अपघात

गोव्यात नाताळ आणि नववर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने पर्यटकांची गर्दी झाली असतानाच बुधवारी दुपारी कळंगुट बीचवर पर्यटकांची बोट समुद्रात बुडाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 20 प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

नववर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांनी गोव्याच्या समुद्रकिनारी गर्दी केली आहे. याचदरम्यान बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कळंगुट बीचवर पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. या अपघातात 54 वर्षीय प्रवाशाचा पाण्यात खोलवर बुडाल्याने मृत्यू झाला, तर एकूण 20 जणांना वाचवण्यात आले.

दुर्घटनाग्रस्त बोटीतील प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील खेड येथील 13 जणांचे कुटुंब होते. सुदैवाने त्या प्रवाशांना वाचवण्यात यश आले. त्यांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.