
आयटीसह अन्य बड्या कंपन्यांतील नोकऱ्यांमुळे पुणेकरांचा खिसा खुळखुळत आहे. परिणामी ‘ऊँचे लोग, ऊँची पसंत’च्या लाईफस्टाईलला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून आलिशान फ्लॅटला शहरात मोठी मागणी आहे. विशेषतः एक कोटीच्या पुढच्याच घरांना प्रचंड मागणी असल्याचे समोर आले आहे.
‘नाइट फ्रैंक इंडिया’ने पुण्याच्या मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. पुण्यात यावर्षी जानेवारी महिन्यात 16 हजार 330 घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत 8 टक्के घट झालेली आहे. प्रामुख्याने 25 लाख ते 1 कोटी रुपये किमतीच्या घरांना मागणी कमी झालेली आहे. याचवेळी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
जानेवारीमध्ये 16 हजार 330 घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 17 हजार 786 घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड हजार घरांची विक्री कमी झालेली आहे. यंदा जानेवारीत घरांच्या विक्रीतून 590 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत 589 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. घरांची विक्री कमी झाली असली तरी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने मुद्रांक शुल्क संकलनात घट झालेली नाही.
जानेवारीमध्ये विक्री झालेल्या एकूण घरांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण 15 टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात ते 13 टक्के होते. याचबरोबर 25 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण 24 टक्के असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के वाढ झाली आहे. मात्र, 25 ते 30 लाख रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण 30 टक्के असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के घट झाली आहे. याच वेळी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण 31 टक्के असून, त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के घट झाली आहे.