
टास्कच्या नावाखाली व्यावसायिक महिलेची 48 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सायबर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद ऊर्फ मोहम्मद इस्रार अब्रार असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी दिल्ली येथून अटक करून मुंबईत आणले.
तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. मार्च महिन्यात त्यांना एकाने मेसेज केला. मेसेज करून पार्टटाइम जॉबची माहिती दिली. डेमो म्हणून त्यांना गुगल मॅपवर जाऊन 20 हॉटेल्सला रेटिंग देण्यास सांगितले. रेटिंग दिल्यास 50 आणि 100 रुपये प्राप्त होतील असे त्यांना सांगितले. जर व्यवस्थित काम केल्यास 8500 रुपये मिळतील असे त्यांना सांगितले. ते काम टेलिग्राम अॅपवरून सुरू करावे लागेल असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवली. रेटिंग देऊन त्या लिंक त्याने पुन्हा एकाला फॉरवर्ड केल्या. तसेच महिलेला बँक खात्याचा तपशील देण्यास सांगितले. रेटिंग दिल्याने महिलेला सुरुवातीला 1500 रुपये तिच्या खात्यात वर्ग केले. त्यामुळे महिलेला तिच्यावर विश्वास बसला.
टास्कच्या नावाखाली ठगाने महिलेकडे पैसे उकळण्यास सुरुवात केली. महिलेने काही खात्यांत 48 लाख रुपये ट्रान्स्फर केले. भरलेले पैसे तुम्हाला परत मिळतील अशा ठगाने त्यांना भूलथापा मारल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना एका खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस दिल्ली येथे गेले. तेथून पोलिसांनी मोहम्मदला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या खात्यात 3 लाख 45 हजार रुपये आले होते. त्याने ते पैसे काढून एकाला दिले होते. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
चरससह घातक शस्त्राची तस्करी करणारा ताब्यात
चरससह घातक शस्त्र्ााची तस्करी प्रकरणी एकाला पवई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मोहंमद सादिक हनीफ सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 किलो चरस, कार, गावठी कट्टा जप्त केला आहे. मोहंमदविरोधात ड्रगबाबत तीन गुन्हे दाखल आहेत.
पवईच्या विहार सरोवर परिसरात काही जण ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रवीण पवार, सहायक निरीक्षक संतोष कांबळे, उप निरीक्षक शोभराज सरक, लांडगे, खंडागळे, अहिरे, गायकवाड, पवार आदी पथकाने सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सादिकला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून 6 किलो 32 ग्रॅम चरस, आणि गावठी कट्टा आढळून आला. कसून चौकशी केल्यावर त्याने घरी देखील चरसचा साठा ठेवल्याची कबुली दिली. सादिकच्या घरातून देखील 7 किलो 185 ग्रॅम चरस जप्त केले. पोलिसांनी 3 कोटी 42 हजार रुपयाचे चरस , गावठी कट्टा आणि कार जप्त केली आहे.