
भरधाव वेगातील कारने मायलेकांना धडक दिल्याची घटना वडाळा परिसरात घडली. यात वरदान निखिल लोंढे या दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर प्रिया ही जखमी झाली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाहनचालक कमल रायविरोधात आर.ए.के. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.
वडाळा राम मंदिर परिसरात प्रिया, तिचा पती आणि मुलगा वरदानसोबत राहते. शनिवारी रात्री प्रिया ही मुलगा वरदानसोबत झोपली होती. काही वेळानंतर तिला तिच्या अंगावरून काही गेल्याचे जाणवले. तिने उठण्याचा प्रयत्न केला. अंगावरून वाहन गेल्याचे समजले. त्यानंतर तिने आरडाओरड केला. काही वेळात स्थानिक रहिवासी गोळा झाले. स्थानिकांनी त्या दोघांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान वरदानचा मृत्यू झाला, तर प्रियावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी कारचालक कमलला ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी आर.ए के. मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रियाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कमलविरोधात गुन्हा नोंद केला. कमलची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर काही बाबींचा उलगडा होणार आहे. कमलला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.