
किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहुणचारासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी गेले. यासाठी महाडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे तब्बल दीड कोटीचा खुर्दा करून चार हेलिपॅड उभारल्याची बाब समोर आली आहे. ‘गीताबागेत’ गेलेल्या शहांच्या एका जेवणावळीसाठी जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी झाल्याने रायगडकरांना शहांचा हा पाहुणचार चांगलाच महागात पडल्याची चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला होता. यानंतर शहा सर्वांबरोबर रोप वेने पाचाड येथे आले. तेथून हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील पाहुणचारासाठी रवाना झाले. यासाठी सुतारवाडी येथे व्हीव्हीआयपींसाठी चार हेलिपॅड उभारण्यात आले होते. हे हेलिपॅड उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने एका दैनिकात जाहिरात दिली होती. त्यात 1 कोटी 39 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे. हे कात्रण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून नेटकऱयांनी या उधळपट्टीवर संताप व्यक्त केला आहे.
निजामपूरमार्गे अवघा 25 मिनिटांचा प्रवास
निजामपूरमार्गे रायगड ते सुतारवाडी हे अंतर अवघे 43 किमीचे आहे. रस्तेमार्गे प्रवास करायचा झाल्यास 25 मिनिटांत हे अंतर कापता येते. त्यामुळे शहा यांनी हेलिकॉप्टरपेक्षा या मार्गाने प्रवास केला असता तर जनतेचे हे दीड कोटी रुपये वाचले असते. एक तासाच्या पाहुणचारासाठी होणारी ही उधळपट्टी शहा यांना थांबवता आली असती, अशी टीका रायगडकरांनी केली आहे.
…तर मीच थेट पेणवरून रायगडावर जेवण नेले असते
एकीकडे वाडय़ा-वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी नागरिक आपला जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना यजमानांच्या घरी एकवेळ जेवायला जाण्यासाठी हेलिपॅडकरिता 1 कोटी 39 लाख रुपये खर्च केला गेला? अमित शाहांना इतकीच भूक लागली होती तर मला तरी सांगायचं होतं मीच पेणमधून थेट रायगडावर जेवण घेऊन गेले असते. निदान इतका खर्च तरी वाचला असता…! अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱयांनी व्यक्त केली.
निविदा मंजूर होण्याआधीच काम
हेलिपॅड उभारण्यासाठी 7 एप्रिल रोजी वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करण्यात आली. सरकारी नियमाप्रमाणे ही ऑनलाइन निविदा 16 एप्रिल रोजी उघडण्यात येणार होती; मात्र त्याआधीच कार्यारंभ आदेश देऊन हेलिपॅड तयार करण्याचे काम करण्यात आले.