संतोष देशमुख हत्येला महिना पूर्ण; अद्यापही एक आरोपी फरारच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्येला आज तब्बल 30 दिवस पूर्ण झाले आहेत. सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सहा आरोपी पकडण्यात यश मिळाले असले तरी अजूनही एक आरोपी फरार आहे. दरम्यान, महिना पूर्ण झाला, घटनेच्या निषेधार्थ मस्साजोग ग्रामपंचायतने आज आपले काम बंद ठेवले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. न्यायासाठी देशमुख कुटुंब अद्यापही टाहो फोडत आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी या कन्येचे डोळे अजूनही वडिलांच्या आठवणीत अश्रू ढाळत आहेत. उघडय़ा पडलेल्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी हजारो लोक पाठीशी उभे राहिले. आपली संवेदनशीलता व्यक्त केली. माणुसकीचे दर्शन दाखवले. त्या कुटुंबाला मानसिक बळ देण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे माणुसकीचा आधार मिळत असताना न्यायासाठी दारोदार हिंडावे लागत आहे ही खंत आहे. महिना उलटूनही कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेसाठी नेमलेली पथके अपयशी ठरत आहेत. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज मस्साजोग ग्रामपंचायतने काम बंद आंदोलन केले.