
विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल क्रमांक-2 नजीक असलेल्या हॉटेल फेअरमाँटच्या टेरेसच्या भागात शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे हॉटेलमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत हॉटेलच्या इमारतीमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या 80 नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच सुखरूप सुटका केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सदर आग हॉटेलच्या एसी युनिट आणि एक्झॉस्ट डक्टिंगमध्ये लागली होती. तसेच ही आग अंदाजे 1,000 ते 1,500 चौरस फूट क्षेत्रात पसरली होती. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने सायंकाळी 5.42 वाजता आग स्तर-1 ची असल्याचे जाहीर केले. 3 फायर इंजिन, 3 जंबो वॉटर टँकर, हाय प्रेशर पंप यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी 6.50 वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
फ्लॅटमधील आगीत जीवितहानी नाही
मरीन लाईन्स, गोल मस्जिद, जाफर हॉटेलजवळ असलेल्या मरीन चेंबर या पाच मजली इमारतीतीच्या दुसऱया मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने दुपारी 12.40 वाजताच्या सुमारास आग स्तर-1 ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाने 5 फायर इंजिन, 5 जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर दुपारी 2 वाजता नियंत्रण मिळविले. या आगीत लाकडी फर्निचर, सोफा, इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, गॅस सिलिंडर रेग्युलेटर, पाईप आदी जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.