मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या वसंत गीते यांचे संपर्क कार्यालय पाडले

मध्य नाशिकचे माजी आमदार, शिवसेना पक्षाचे वसंत गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय शनिवारी महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाने पाडले. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या दबावाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. राजकीय सूडापोटी ही हुकूमशाही सुरू असून, आगामी निवडणुकीत जनता सत्ताधाऱयांना धडा शिकवील, असा इशारा गीते यांनी दिला आहे.

मुंबई नाका येथे शिवसेनेचे वसंत गीते यांचे चाळीस वर्षांपासून संपर्क कार्यालय आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या येथे सोडविल्या जातात. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गीते आणि भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्यात बाचाबाची झाली होती. या मतदारसंघातून शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांना मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत पराभव होईल, या धास्तीने फरांदे यांनी दबावतंत्र सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्या आदेशाने शनिवारी सायंकाळी हे संपर्क कार्यालय महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाने पाडले. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो’, ‘वसंत गीते आगे बढो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माजी महापौर यतिन वाघ, प्रशांत दिवे, प्रथमेश गीते, संपत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आदींनी या दंडेलीचा निषेध केला. संजय चव्हाण, भगवंत पाठक, मामा राजवाडे, शंभू बागुल, रवींद्र जाधव, ऋषी वर्मा, बाळासाहेब कोकणे, गुलाब भोये आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी हजर होते.

मोठय़ा भाभीला धडा शिकविणार – वसंत गीते
एमडी ड्रग्ज विकणाऱया छोटय़ा भाभीला पाठीशी घालण्याचे काम आमदार देवयानी फरांदे यांनी केले, त्यामुळेच त्यांना मोठी भाभी म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. आता विधानसभेत आपला पराभव होईल, अशी धास्ती मोठी भाभी अर्थात फरांदे यांना असल्याने त्यांच्या हट्टामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाचा यात दोष नाही, हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना, तीन जुलै ही तारीख दिलेली असताना, केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. आता यापुढे हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहील. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत निश्चित दिसतील, असा इशारा वसंत गीते यांनी दिला.

महापालिकेला अधिकारच नाही – बडगुजर
संपर्क कार्यालयाची जागा एसटी महामंडळाची आहे. हा वाद न्यायालयात आहे. असे असताना केवळ राजकीय दबावाने हे सर्व केले गेले. ही कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नाही, असे यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.