‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिना’निमित्त पालखी सोहळा

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ ‘जय भवानी, जय शिवाजी…’ असा आसमंत दणाणून टाकणारा जयघोष आणि शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी अशा शिवमय वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिना’निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला 358 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिकेतर्फे ‘358 व्या आग्य्राहून सुटका स्मृती दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.