भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दर्जेदार सुविधा निर्माण केल्या आहेत. यामध्ये जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळप्रतिबंधक आच्छादन, स्नानगृह, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्ंजग सुविधा, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता आणि औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी आज या सुविधांचा आढावा घेतला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱया अनुयायांकरिता चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवासुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. अनुयायांच्या सुविधेकरिता यंदा जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादनाची व्यवस्था सुमारे 18 हजार 500 चौरस मीटर इतक्या क्षेत्रात करण्यात आली आहे. तसेच जलफवारणी आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.
आठ हजार अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर
- जवळपास 8 हजार मनुष्यबळ या सर्व सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी कार्यरत आहे. सुविधांमध्ये वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये 3 कक्ष उभारण्यात येणार आहेत.
- तसेच 11 रुग्णवाहिकांची उपलब्धताही करून देण्यात आली आहे. मैदान परिसरात अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
- एकूण वैद्यकीय आणि सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी मिळून 585 मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहे. गतवर्षी एकूण 13 हजार 824 अनुयायांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता.
भीमा तुम्हा वंदना!
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेच्या 1 लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येणार आहे. या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन 5 डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘भीमा तुम्हा वंदना’ या या शीर्षकाखालील माहिती पुस्तिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित अभिवादनपर गीते ही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अशा गीतांचा समावेश पुस्तिकेत करण्यात आला आहे.