हॅप्पी ‘खड्डे’ डोंबिवलीकर; रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी मिंधे गटाने बॅनर लावून डिवचले

कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप आणि मिंधे गट यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा मिटण्याचे नाव घेत नसतानाच आज मिंधे गटाने पुन्हा भाजपला डिवचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॅप्पी खड्डे डोंबिवलीकर असे वादग्रस्त बॅनर शहराच्या अनेक भागात लावले. त्यामुळे भाजपवाले आणि चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये संतापाचा भडका उडाला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी बॅनर्सचे डिझाईन तयार करणाऱ्या जॉली प्रिंटरच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून बॅनर्स लावणाऱ्यांचा ते कसून शोध घेत आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मिंधे गटात वाद उफाळून आला होता. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी ते फक्त शोबाजी करतात. त्यांच्यामुळे या महामार्गाची वाट लागली आहे, असे आरोप मिंधे गटाचे रामदास कदम यांनी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रवींद्र चव्हाण यांचा संताप अनावर झाला. रामदास कदम हा अडाणी माणूस आहे. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, समोर आले तर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच चव्हाण यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हा प्रकार घडून एकच महिना उलटलेला असताना आता पुन्हा भाजप आणि मिंधे गटातील वाद उफाळून आला आहे.

बॅनर लावणारा गायब

डोंबिवली पश्चिम भागात अनेक ठिकाणी मिंधे गटाच्या वतीने हॅप्पी खड्डे डोंबिवलीकर असे वादग्रस्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर डोंबिवली शहरातील विविध रस्त्यांच्या दुर्दशेचे फोटो झळकवण्यात आले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपच्या गोटात एकच पळापळ उडाली. हा वादग्रस्त बॅनर्स झळकवल्याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बॅनर्सचे डिझाईन आणि छपाई करणाऱ्या जॉली प्रिंटरच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर लावणारा मात्र पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.