
विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरणे कमी केल्यास आणि अभ्यासाचे नियोजन केल्यास परीक्षेत यश हमखास मिळते, असे सांगितले जाते. भुवनेश्वर येथील ओमप्रकाश बेहराने मोबाईल वापरणे बंद करत दररोज किमान आठ तास अभ्यास केल्याने त्याला जेईई मेन्समध्ये घवघवीत यश मिळाले आहे. तो ओडिशा राज्यातून पहिला आला असून त्याला 300 पैकी 300 गुण मिळाले आहेत. तो गेल्या तीन वर्षांपासून राजस्थानच्या कोटामध्ये राहून जेईईची तयारी करत होता. शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने फॉलो केल्या. अखेर त्याला मेहनतीचे फळ मिळाले. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. तो सतत अभ्यासात गुंतून असायचा. दहावीला त्याला 92 टक्के गुण मिळाले होते. ओम प्रकाशचा जन्म 12 जानेकारी 2008 रोजी ओडिशातील उच्च शिक्षित कुटुंबात झाला. कडील कमलाकांत बेहरा हे शासकीय अधिकारी आहेत. ओमप्रकाश बेहरा कोचिंग सोबत 8 ते 9 तास अभ्यास करायचा. बाराकीत सुद्धा चांगले मार्क मिळतील, अशी अपेक्षा ओम प्रकाश बेहराला आहे.
आयआयटी मुंबईत शिकायची इच्छा
ओमप्रकाशला आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मोबाईल हातात असल्यानंतर अभ्यासात लक्ष लागत नाही, मन विचलित होते. त्यामुळे मी जेईईची तयारी करत असताना मोबाईलला पूर्णपणे दूर ठेवले. त्यामुळे मला हे यश मिळवता आले. ओमप्रकाशची आई स्मिता राणी या ओडिशात एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन वर्षे सुट्टी घेऊन त्या कोटात मुलांसोबत राहत होत्या.