
जम्मू कश्मीरमधील गुलमर्गमधील एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये एक फॅशन शो पार पडला. या फॅशन शोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तेथील स्थानिक लोकं व नेते मंडळी भडकली आहेत. रमझानच्या पवित्र महिन्यात असा आक्षेपार्ह कार्यक्रम आयोजित केल्याची लोकांची तक्रार आहे. यावरून जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवम आणि नरेश या फॅशन डिझायनरने एलॅ इंडिया फॅशन शो आयोजित केला होता. या शोमध्ये मॉडेल्स बर्फाच्छादित रॅम्पवर चालल्या. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते फोटो पाहून गुलमर्ग मधील लोकं भडकली. एले इंडियाने देखील याचे फोटो व पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्य़ावरून आता वाद निर्माण झाला आहे.
”लोकांचा राग, संताप समजण्यासारखे आहेत. मी जे फोटो बघितले त्याने या रमजानच्या पवित्र महिन्यात स्थानिक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. लोकांचा संताप आम्ही समजू शकतो. मी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी येत्या 24 तासात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे.