ओमानमध्ये मशिदीजवळ अंदाधुंद गोळीबार, एका हिंदुस्थानी व्यक्तीसह 6 जणांचा मृत्यू

ओमानची राजधानी मस्कतमध्ये एका मशिदीजवळ सोमवारी अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. रॉयल ओमान पोलिसांनी एक्स पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

रॉयल ओमान पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, हा गोळीबार ओमानची राजधानी मस्कतच्या वादी अल कबीर परिसरात झाला आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी झाला याबाबत पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. अधिकृत आकड्यानुसार या गोळीबारात 30 लोकं जखमी झाली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गोळीबार केलेल्या तीन बंदुकधाऱ्यांना मारण्यात आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेत चार पाकिस्तानी मारले गेले आणि या व्यतिरिक्त 30 पाकिस्तानी नागरिकांचा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.