विरोधी पक्षांची चाणाक्ष खेळी, लोकसभा अध्यक्ष निवडीत मतदान न घेऊन भाजपला दिली धोबीपछाड

दिल्लीतील राजकीय डावपेचांनंतर अखेर ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी विरोधी पक्षांनी मतदानाची मागणी केली नाही. या निर्णयाने ‘इंडिया’ आघाडीने सत्ताधारी भाजपला धोबीपछाड देत सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाला विरोधी पक्षांनी विरोध न केल्याने मोदी सरकारसाठी हे एक सरप्राइज होते. लोकसभा अध्यक्षांच्या निवडी वेळी विरोधी पक्षांकडून मतदानाची मागणी केली जाईल आणि पूर्ण प्रक्रियेनुसार मतदान होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड होताच एक मोठा ट्विस्ट आला. विरोधी पक्षांनी मतदानाची मागणी केलीच नाही आणि आवाजी मतदान मान्य केले गेले.

कोटामधून तिसऱ्यांदा खासदार झालेले ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होणारे ते तिसरे नेते ठेरले आहेत. त्यांच्या पूर्वी बलराम जाखड हे 9 वर्षे लोकसभा अध्यक्ष होते. ओम बिर्ला हे आणखी पाच वर्षे लोकसभा अध्यक्षपदी राहिल्यास हा एक विक्रम ठरेल. आतापर्यंत कोणीही 10 वर्षे लोकसभा अध्यक्षपदी राहिलेले नाही.